Dadasaheb Tare Charitable Trust, Achalpur
स्वकर्तृत्वाचा कल्पवृक्ष
श्री कृ.वा.उपाख्य दादा साहेब

मन माझ्यात तू ठेव| बुद्धी माझ्यात राख तू ||
म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये||

दादांचा जन्म १३ मे १९३२ वैशाख्य शुद्ध तृतीया म्हणजे नृसिह जयंतीच्या नवरात्रात तिसऱ्या माळेला म्हणजे अष्टमीला पथ्रोट येथे झाला. अष्टमीचा जन्म म्हणजे कृष्ण नांव ठेवण्यात आले. दादांचे प्राथमिक शिक्षण अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट या ग्रामीण भागात झाले. कुटुंबाची परीस्थिती अत्यंत हलाखीची त्यामुळे आठवीनंतर शिकण्यास बंधन आली व कीर्तन, भिक्षुकी करायला सुरुवात केली. श्री लक्ष्मीनृसिंहाच्या अतूट श्रद्धेपोटीच व शिकण्याची प्राथमिक इच्छा असल्यामुळे सर्व शिक्षण बाहेरगावी दुसऱ्याच्या घरी राहून त्यांची मर्जी राखून पूर्ण केले. मॅट्रिक झाल्याबरोबर नोकरी करून एम.ए.इम.एड. पर्यंतची मजल त्यांनी स्ववलंबनाने व स्वतःच्या भरवशावर गाठली. अचलपूर हे इतिहासाच्या मांडीवर डोके टेकून सुस्तपणे पहुडलेले एक विशाल ऐतिहासिक नगर त्या नगरात श्रीमंत बाबासाहेब देशमुखांनी विविध चिरस्थायी उपक्रमांनी त्याला वर्तमानाचे भान आणून दिले तर सुदाम देशमुखांनी आधुनिक दृष्टीकोन प्राप्त करून दिला.

सरंजामी मानसिकता नष्ट करून अशा अचलपूरला महाविद्यालयाची निर्मिती व्हावी हा विचार दादांच्या मनात पहिल्यांदा आला व नामदेवराव हेडाऊच्या समर्थ पुढाकाराने जगदंब महाविद्यालायाची स्थापन झाली. भाऊसाहेबांच्या आशिर्वादाने समर्थ शिक्षणशास्त्र संस्थेचा जन्म झाला. परतवाड्यापासून काही अंतरावर असलेल्या वडगाव फत्तेपूर या गावी सोनकुले विद्यालय या पहिल्या शाळेची स्थापन झाली. सुलतानपुर येथील व्यंकटेश विद्यालयाचे दत्तकविधान झाले व परतवाड्यात कला महाविद्यालयाची १९९१-९२ मध्ये स्थापन झाली. त्यापाठोपाठ २००३ मध्ये बी.एड. व २००६ मध्ये डी.एड. महाविद्यालयाची स्थापन झाली. प्रत्येक व्यक्तीभोवती वलय असतेच परंतु दादांच्या जीवनरूपी वर्तुळाला कार्याचे ज्ञानाचे व मानवतेचे वलय आहे. शासकीय व शिक्षण मंडळाच्या विविध सामितींवर कार्य केले. दादांना राज्यपुरस्कार मिळाला. दादांनी इंग्लंडचा अभ्यास दौरा केला. स्वतःच्या हिंमतीवर व इच्छेवर कठीण परिस्थितीला सामोरे जात असामान्य व्यक्तिमत्वाची घडण दादांची स्वकर्तुत्वावर उभी आहे.